मुंबई – सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे रणांगण सुरु आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान आता उद्या म्हणजे सोमवारी पार पडणार आहे. अशातच अनेक आरोप, प्रत्यारोप, टीका नेत्यांची विरोधकांवर सुरु आहेत अशातच माजी कृषिमंत्री शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार सोशल मीडियावर भडकल्याचं पाहायला मिळाले आहे. त्यांनी पंकजा मुंडे यांचे भाऊ आणि निवडणूक आयोगाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

काय म्हणाले रोहित पवार..?

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. बूथ ताब्यात घेण्याचा नवा परळी पॅटर्न असे म्हणत रोहित पवारांनी ट्विट केले आहे. त्यांनी असे म्हटले, बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. पंकजा ताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल.

महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का ? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. निवडणूक आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया!, असे म्हणत रोहित पवारांनी आयोगावरही हल्लाबोल केला आहे. रोहित पवारांच्या आरोपांवर पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.