सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बंडाचे निशाण हाती घेतले होते. यानंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु असताना धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रविवारी (14 एप्रिल )शरद पवार गटाचे नेते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे प्रवेश केला. यानंतर त्यांनी सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

पक्षप्रवेशावेळी बोलताना धैर्यशील मोहित पाटील म्हणाले की, एका माणसाला मला उत्तर द्यायचं आहे. आपण त्याला इथून निवडून दिला. त्याने मांडव्यात एक प्रश्न विचारला की, 70 -75 वर्षात जेवढा विकास झाला, तो मी पाच वर्षात केला आहे. त्याला मला एवढंच सांगायचं आहे की, दादांच्या सांगण्यावरून लोकांनी तुला एका रात्रीत आमदार केला. त्यामुळे आता तुझं पार्सल एका रात्रीत माघारी बीडला पाठवणार आहे. तुम्ही माझ्या कुटुंबावर तीन पिढ्या प्रेम करत आला आहात. त्यामुळे तुम्हाला शब्द देतो की, सहकार महर्षी आणि विजयदादांच्या विचारांना तडा जाऊ देणार नाही, असे धैर्यशील मोहित पाटील यांनी म्हटले.

राम सातपुते यांच्यावर निशाणा साधताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, मी वर्षाला 1 लाख कोटी आणले, तासाला हजार कोटी आणले असं सातुपते म्हणतात, पण त्यांचे काम दिसले का तुम्हाला? सातपुतेंना काय काम करायचे हे सुद्धा माहिती नाही. मी प्रत्येक तालुक्यात गेलो. वृद्धांसाठी चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला. केंद्रातून वृद्धांसाठी साहित्य आलं आणि माळशीरस तालुक्यात वाटप झालं. पण सातपुते यांनी प्रत्येक तालुक्यात फोन करून सांगितलं वाटप करायचं नाही म्हणून.
मी बीडीओला आणि सीईओला फोन लावला, तर सामान अजूनही पडून आहे. अपंग लोकांना साहित्य मिळू दिलं नाही. स्थानिक आमदार सगळे विरोधात आहेत. त्यांनी सांगितलं साहित्य वाटायचं नाही, साहित्य वाटायचं असेल तर आमच्या हाताने वाटायचं. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना फोन लावला. आमच्या हस्ते वाटप नाही झालं तरी चालेल, पण गोर गरिबांसाठी साहित्य आलं आहे, ते त्यांन मिळू द्या. पण अजूनही वाटप झालेलं नाही. सर्व साहित्य गोडाऊनमध्ये पडून आहे. एक लाख कोटी याचे कुठे गेले मला समजत नाही? असा प्रश्न धैर्यशील मोहित पाटील यांनी उपस्थित केला.