मुंबई : लोकसभेच्या पुढील टप्प्यातील प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास राहिले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचारावर मोठा भर दिला जात आहे. मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडत आहेत. यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ही भेट कशासंदर्भात होती याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अचानक जय पवार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. जय पवार मुंबईतून हेलिकॉप्टरने थेट छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. तेथून कारने अंतरवाली सराटी येथे पोहोचले. जय पवार यांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मनोज जरांगे यांच्याशी त्यांची भेट झाली. जय पवार यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. परंतु, या भेटीनंतर आता चर्चांना सुरुवात झाली आहे. 

तर अंतरवाली सराटी  मध्ये आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी जय पवार यांचं स्वागत केल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आज अचानक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.   निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीचं सत्र सुरूच असल्याचं दिसतं. त्याचदरम्यान ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.