पुणे, (प्रतिनिधी ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान प्रक्रिया सुरू असून पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात ७ जानेवारी तर पुणे, शिरुर, मावळ लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पुण्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांना निवेदनाद्वारे केली.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या चारही लोकसभा मतदारसंघात उन्हाची तीव्रता अधिक असून, तापमानाची तीव्रता ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. दरम्यान, उष्ण तापमानामुळे मतदानासाठी बाहेर पडण्यास मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो. या पार्श्वभूमीवर पुण्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती आज सुहास दिवसे यांना निवेदनाद्वारे केली.

या निवेदनात प्रामुख्याने प्रत्येक मतदान केंद्रांवर मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, मतदान केंद्रांवर वैयकीय पथक तैनात करणे, दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करावी या विषयांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत पाटील यांनी सकारात्मक विनंती वजा चर्चा केली. यावेळी भाजपा लोकसभा निवडणूक प्रभारी दिपक पोटे हे देखील उपस्थित होते.