मुंबई: भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी प्रचारसभेत बोलताना महाविकस आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावर टीका केली होती. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे यांनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी काल, 4 मे ला कणकवलीत त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह विनायक राऊतांनाही लक्ष्य केलं होतं. नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे, असा टोला राज ठाकरेंनी विनायक राऊतांना लगावला होता. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना नकली मोदी भक्त म्हंटल आहे.

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी बाकावर बसणाऱ्या खासदारांनी अनेक विकास केले आहेत. परंतु, मौनी खासदाराचं कौतुक करण ही सध्या राज ठाकरेंची मजबुरी असल्याचं ते म्हणाले. राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी त्यांना नकली मोदी भक्तदेखील म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, विनायक राऊत यांना बाकावर बसणारा खासदार म्हणणं चुकीचं आहे. बाकावर बसून, बाक बडवून अनेक खासदारांनी आपले प्रश्न लोकसभेत मांडले आहेत. विकास कोकणात आणला आहे. असं बोलून राज ठाकरेंनी कोकणातील खासदारांचा अपमान केला आहे. काही मोदींचे अंध भक्त मधेच जागे होतात. पण ते ही नकली अंध भक्त असतात. काही दिवसांतच त्यांचे विचार बदलतील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.