कुरुंदवाड (प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातच देश सुरक्षित असून चौफेर प्रगती साधत आहे.विरोधकाकडे मुद्दाच नसल्याने संविधान बदलणार लोकशाही संपणार अशी दिशाभूलीचे व संभ्रमाचे वातावरण पसरविण्यात येत असल्याची टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ.संजय पाटील, राहुल आवाडे, रजनीताई मगदुम प्रमुख उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी देशातील जातीय व्यवस्था व सामाजिक स्थितीचा अभ्यास करुन घटना लिहीली आहे कुणीही घटना बदलू शकणार नाही.त्यामुळे अस्वस्थ व्हायची गरज नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून खासदार धैर्यशील माने यांना विजयी करा. ते तरुण आणि उमदे आहेत. त्यांनी अतिशय चांगले काम केले आहे.पुन्हा एकदा त्यांना संधी द्या ते आपले कर्तृत्व सिध्द करतील
.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले,काँग्रेसला जे ४०-४५ वर्षात जे जमले नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवले आहे. देशातील ८० कोटी जनतेला ३ किलो गहू, २ किलो तांदूळ प्रतिव्यक्ती मोफत देण्याचा निर्णय घेतला. ६ जिन्नस १०० रुपयात देण्याचाही निर्णय झाला. शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार देण्याची भूमिका घेतली आणि राज्य सरकार ६ हजार रु. देत आहे. त्यातून दलित, मुस्लिम यांना वगळले नाही हे लक्षात घ्या.संविधान लोकशाही राज्यघटना याबाबत समाजात जातीधर्मात तेढ होईल असे वातावरण पसरविले जात आहे.घटनेला नखही लागणार नाही याची खात्री मला व मुश्रीफ यांना आहे.

त्यामुळे दलित मुस्लीम इतर मागासवर्गीयांनी घाबरायचं नाही.धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या.पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा. मयुरचे अध्यक्ष संजय पाटील ,युवा नेते राहुल आवाडे, रजनीताई मगदुम यांची भाषणे झाली.भाजप नेते रामचंद्र डांगे यांनी शहरातून धैर्यशील माने यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त करतानाच खासदार निधी व आमदार निधीतून झालेल्या कोट्यावधीच्या कामाचा आढावा घेतला.

यावेळी माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, उदय डांगे,चंद्रकांत मोरे,अली पठाण रघु नाईक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद आलासे यांनी आभार मानले.