सातारा : शरद पवार गटाचे नेते आणि सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ताब्बेतीचे कारण देत माघार घेतली असल्याने साताऱ्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यानंतर विधान परिषदेचे आमदार शाशिकन शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात होते. पण श्रीनिवास पाटील हे आपला मुलगा सारंग पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे समजत आहे. तर शशिकांत शिंदे यांनी संधी दिल्यास निवडणूक लढणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघानंतर अतिशय प्रतिष्ठेचा केलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार ठरलेला नाही. ऐनवेळी श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीतून घर घेतल्याचे सांगितले होते. यानंतर शरद पवार यांच्याकडून उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात आढावा घेतला जात होता. त्यामुळे माढामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार आणि साताऱ्यामध्ये महायुतीचे संभाव्य उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कोण चेहरा असणार याची चर्चा अजूनही सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शरद पवार गटांकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसलेल्या श्रीनिवास पाटील यांनी आपल्या मुलासाठी आग्रही मागणी केल्याने ही उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडते हे लवकरच समजेल.

तर शशिकांत शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी संदर्भात आज श्रीनिवास पाटील, सारंग पाटील आणि आमची शरद पवारांसोबत बैठक झाली असून कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असल्याची भूमिका श्रीनिवास पाटील यांनी मांडली आहे. ते पुढे म्हणाले की, शरद पवार संसदीय बोर्डाच्या माध्यमातून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि तो आम्हाला मान्य असेल.

श्रीनिवास पाटील मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही
ते पुढे म्हणाले की, आजही स्थानिक परिस्थिती काय आहे याचा आढावा आमच्याकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आदेश दिल्यास आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढू असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे इच्छुक असतानाच सारंग पाटील यांच्यासह श्रीनिवास पाटील सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली असली, तरी सारंग पाटील यांच्या उमेदवारीसाठी श्रीनिवास पाटील ठाम आहेत.

शशिकांत शिंदे यांनी पक्षाने आदेश दिल्यास रणांगणात उतरून महायुतीच्या विरोधात जोरदार लढत देण्याची तयारी असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाणार याकडे सातारावासियांचं लक्ष आहे. आज सातारचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.