मुंबई – बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते. आमिर आपल्या प्रत्येक सिनेमामध्ये प्रचंड मेहनत घेत असतो. त्याला त्याच्या सिनेमामधील त्याची भूमिका परफेक्ट लागत असते. प्रत्येक सिनेमामध्ये तो वैयक्तिक लक्ष घालत असतो. पण फक्त सिनेमाच्या भूमिकेसाठीच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा आमिर परफेक्ट आहे. याबाबत स्वतः आमिरने खुलासा केला आहे.

काय म्हणाला आमिर खान..?

आमिर खानने आपल्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ चा टॅग मिळण्यासाठी एक कप चहा जबाबदार असल्याचे गमतीत म्हटले. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ मध्ये आमिर खानने हजेरी लावली होती. त्यावेळी आमिर खानने किस्सा सांगितला. आमिर खानने सांगितले की, आपल्याला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ चा टॅग हा अभिनेत्री शबाना आझमी यांनी दिला.

आमिर खान पुढे म्हणाला, मी त्यावेळी सिनेसृष्टीत अगदी नवखा होतो आणि दिल चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले होते. तर, बाबा आझमी हे कॅमेरामन होते. बाबा आझमी हे आघाडीचे कॅमेरामन होते. आम्ही कधी कधी त्यांच्या घरी जायचो. एकेदिवशी आम्ही काहीजण एका विषयावर गहन चर्चा करत होतो. कदाचित तो विषय चित्रपटाशी संबंधति असावा, मी त्यात खूपच गुंतलो होतो. त्याच वेळी शबाना आझमी चहा घेऊन आल्या. त्यांनी मला चहामध्ये किती चमचे साखर हवी असे विचारले.

मी विचाराच्या तंद्रीत होतो, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. मग, त्यांनी पुन्हा आवाज देऊन विचारले. मी मागे वळून शबाना आझमी यांच्याकडे पाहिले. त्यांना उत्तर देण्यासाठी मला काही सेकंद लागले. मी विचारले, ‘कप किती मोठा आहे?’ त्यांनी मला कप दाखवला. मी अजूनही त्या चर्चेच्या तंद्रीत होतो. मग मी विचारले किती मोठा चमचा आहे, त्यांनी मला चमचा दाखवला आणि मग मी म्हणालो, ‘एक चमचा.’

ही गोष्ट शबाना आझमी यांनी सगळीकडे सांगितली. ‘तुम्ही आमिरला ‘साखर किती?’ असे विचाराल तर तो तुम्हाला कप आणि चमच्याचा आकार विचारेल.’ असे गंमतीत शबाना सांगत असे तो म्हणाला

आमिरखान सिनेसृष्टीत या सिनेमातून धमाकेदार कमबॅक करणार..?

आमिर खान अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. करीना कपूर अभिनीत ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमात शेवटचा दिसला होता. आमिरचा हा सिनेमा रुपेरी पडद्यावर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्याने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये आमिरचा एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. आमिरला आता मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आमिरखान खान सिनेसृष्टीत धमाकेदार कमबॅक करणार आहे. आमिर खानचा आगामी सिनेमा हा 2018 मध्ये आलेला स्पॅनिश सिनेमा ‘कैम्पियन्स’चा रिमेक आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.