सांगली ( प्रतिनिधी ) महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेसाठीच्या उमेदवारीवरुन सुरु असलेली रस्सीखेच अद्याप संपलेली नाही. सांगलीची जागा उद्धवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर करणार असल्याचं म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी प्रसंगी टोकाची भुमिका घेऊ असं म्हटल्याने ही जागा कोणाच्या पदरात पडणार ? असा सवाल विचारला जात आहे. यातच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची 21 मार्च रोजी सांगली येथे जाहीर सभा होणार असल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

या दोन्ही पक्षांच्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीत वातावरण चांगलंच तापलं असून उद्धव ठाकरे याबाबत नेमकी काय भुमिका घेणार ? याची उत्सुकता आता सांगलीकरांना लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे उद्या सांगलीत आगमन झाल्यानंतर प्रथम माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मृतिस्थळी जाऊन वसंतदादांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून दोन्ही पक्षामध्ये सुरू असलेला राजकीय वाद निवळणार की वाढणार ? हे उद्धव ठाकरेंच्या भुमिकेवरच ठरणार आहे.

चंद्रहार पाटील, अथवा विश्वजीत कदम यापैकी एकाला घ्यावे लागणार नमते.
उद्धव ठाकरे जी भुमिका घेतील त्यावर चंद्रहार पाटील, अथवा विश्वजीत कदम यांच्यापैकी कोणाता पत्ता कट होणार हे ठरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला ह्या प्रसंगाला शिताफीने तोंड द्यावे लागणार असून, चंद्रहार पाटील, अथवा विश्वजीत कदम यापैकी एकाला पक्षश्रेष्टींच्या निर्णयानुसार नमते घ्यावे लागणार हे निश्चित आहे.