अहमदनगर (प्रतिनिधी) : विरोधी पक्षाने त्यांच्या काळात कधी सरसकट मदत केली, हे त्यांनी शपथ घेवून सांगावे, असे आव्हान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (गुरूवारी) विरोधी पक्षाला दिले.
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते पालकमंत्री म्हणून अहमदनगर दौऱ्यावर आहे. त्यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, आम्ही अनेक वर्ष राज्याचे कामकाज चालवले आहे. जनतेला मदत कशी मिळवून द्यायची ते आम्हाला माहित आहे. आमची जनतेशी नाळ आहे. त्यामुळे आता आम्ही काय करावे, हे विरोधकांनी सांगण्याची गरज नाही. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केल्याशिवाय मदत देता येत नाही. विशेष म्हणजे नुकसानग्रस्तांचे पंचनामे करावे, असा केंद्र सरकारचाच आग्रह असतो. त्यामुळे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकार नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर करेल.