गडहिंग्लज (प्रतीनिधी) : विधानपरिषदेच्या रणधुमाळीत नेत्यांच्या भेटीगाठींना जितका वेग आलाय, त्याहून जास्त महत्वही आलंय. महाविकास आघाडीकडून ना. सतेज पाटील आणि विरोधात महाडिक कुटुंबीय जिल्ह्यातील सर्वच नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज (सोमवार) ना. पाटील यांनी गडहिंग्लज येथे जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमावर श्रीपतराव शिंदे यांनी ना. पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या. मात्र, याबाबत ‘लाईव्ह मराठी’ने विचारणा केली असता शिंदे यांनी ‘ते नगरसेवक ठरवतील’ असं स्पष्ट केलंय. तर नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी ‘याविषयी शिंदे साहेब सांगतील’ असं संगितले आहे. त्यामुळे जनता दलाचं नेमकं काय ठरलंय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जनता दलाची सत्ता असणारी ‘गडहिंग्लज’ ही बहुधा राज्यातील एकमेव नगरपालिका आहे. गेल्या अनेक निवडणुकीत जनता दलाचे नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाने पालिकेवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे. गत निवडणुकीतही जनता दलाने १० जागांवर विजय मिळविला. तर शिंदे यांची कन्या प्रा. स्वाती कोरी यांची जनतेतून नगराध्यक्ष निवड झाली. हद्दवाढीनंतरच्या पोटनिवडणुकीत १ जागा मिळाली. आणि भाजपकडून निवडून आलेल्या एक नगरसेविका जनता दलात सामील झाल्या. या शिवाय दोन स्वीकृत नगरसेवकही जनता दलाचे झाले. त्यामुळे विधानपरिषदेला जनता दलाच्या १५ मतांचा गठ्ठा आहे. साहजिकच त्यासाठी दोन्ही उमेदवाराकडून रस्सीखेच होणार..!

दरम्यान, आज ना. सतेज पाटील यांनी गडहिंग्लजमध्ये शिंदे यांची भेट घेतली. तेंव्हा नगराध्यक्षासह जनता दलाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. मात्र, सतेज पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याबाबत कुणीही ‘ठाम’ वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे पाठिंब्याबाबत अद्याप संभ्रमावस्था असून ‘ठोस’ काहीही सांगता येत नाही.