दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या स्थापनेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आशीर्वाद आहेत. आमचे सरकार अडीच वर्षे टिकणार आणि पुढच्या निवडणुकाही आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत राज्यात पुन्हा निवडणूक घेऊन निवडून येण्याचे बंडखोर आमदारांना आव्हान दिले होते. त्याला उत्तर देताना शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मविआ सरकारमध्ये वि. दा. सावरकरांवर आम्ही बोलू शकत नव्हतो. सभागृहात तोंड दाबून बुक्‍क्‍याचा मार खाल्ल्याचे सांगून ते म्हणाले, राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सदिच्छा भेट घेत असतो. त्याप्रमाणे आपण राष्ट्रपती महोदय आणि अमित शाह, जे.पी नड्डा यांचीही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही २०१९ मध्ये सार्वजनिक निवडणुका आम्ही शिवसेना-भाजप युती म्हणून लढवल्या होत्या. पुन्हा आत्ता लोकांना हवी असणारी सत्ता, लोकांच्या मनातले सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आम्ही वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आलो आहोत. हे सरकार लोकांचे आहे. लोकांच्या हितांची जपणूक करणारे आहे. शेतकरी, कामगार, सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. त्याला केंद्राचे आशीर्वाद हे गरजेचे आहेत. राज्याच्या विकासात आम्ही पंतप्रधानांचे व्हिजनही समजून घेणार आहोत, असेही ते म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना शिंदे गटावर परखड शब्दांत टीका केली आहे. ‘शिवसेना आमच्याच बापाची आहे. त्यांना ५० खोके पचणार नाहीत. थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरु होतील’, असे संजय राऊत म्हणाले होते. मुख्यमंत्री शिंदेंना यासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्यावरून त्यांनी खोचक शब्दांत टीका केली. ‘फक्त ५०? पण ५० खोके कसले? मिठाईचे की अजून कसले?’ असा प्रश्न विचारत शिंदेंनी राऊत यांना टोला लगावला.