पुणे (प्रतिनिधी) : जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिले होते. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, अशी खंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड सेंटरला पाटील यांनी  आज (रविवार) भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकांनी तुम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिले आहे.  यावर बोलताना पाटील म्हणाले की,  आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिले होते. विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो. विरोधकांची भूमिका ही अंकूश शक्ती असते. कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. रेमडेसिवीरचा विषय आता नियंत्रणात आहे. ऑक्सिजनचा विषयही नियंत्रणात येत आहे. कोरोनाच्या या वातावरणात राजकारण करणे योग्य नाही. मात्र, कोविड आहे काय हवं ते करून घ्या, असेही करून चालणार नाही,  त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात  भाजपला बसावे लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. मात्र, हे सरकार औटघटकेचे ठरले. त्यानंतर  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे महाविकास आघाडीचे सरकार विराजमान झाले. याचीच सल चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली.