कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून पाचगाववासीयांना भेडसावत असलेल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून मार्गी लागला आहे. आ. पाटील यांनी पाचगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा केली. सोमवारपासून पाचगाव परिसरातील नागरिकांना दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्याची ग्वाही प्रशासक डॉ. बलकवडे यांनी दिली.

महापालिकेकडून पाचगावसह आर. के. नगर, दिंडेनगर, अष्टविनायक नगर, गुलमोहर कॉलनी, भारत माता कॉलनी, प्रथमेश कॉलनी, तारा कॉलनी, सहजीवन सोसायटी, द्वारकानगर, शांतादुर्गानगर, केएमटी कॉलनी, निगडे मळा, गणेशनगर, रेणुकानगर, हरी पार्क, चित्रनगरी आणि मोरेवाडी या भागात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.

या प्रश्नासंदर्भात आ. ऋतुराज पाटील यांनी गुरुवारी प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. महापालिका निवडणूक कार्यालयात ही बैठक पार पडली. स्थानिकांना येणाऱ्या अडचणी, महापालिकेसमोरील तांत्रिक अडचणी या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या भागाची व्याप्ती मोठी असल्याने पाणीपुरवठा प्रश्न निर्माण होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सध्या पाचगावसह आसपाच्या भागाला पाच दिवस आड पाणीपुरवठा होतो. तो एक दिवसआड करण्यात यावा, अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केली. यावर प्रशासक बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत तत्काळ याची अंमलबजावणीचे आदेश दिले. बैठकीत पाचगावच्या उपसरपंच डॉ. स्नेहल शिंदे, ग्रा.पं. सदस्य प्रवीण कुंभार, संग्राम पोवाळकर, संदीप गाडगीळ, शिवाजी दळवी यांनी विविध प्रश्न मांडले.

पाचगावमध्ये एखाद्या ठिकाणी लिकेज झाले तर ते ग्रामपंचायतीला काढावे लागते. जर डिपॉझिट आणि पाणी बिल महापालिका घेत असेल, तर त्याचा देखभालीचा भुर्दंड ग्रामपंचायतीला का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावर प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सर्वांना योग्य त्या सूचना दिल्या. यातील जुन्या मोटारी बदलण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी जलअभियंता हर्षदीप घाटगे, जलअभियंता प्रिया पाटील, वॉर्ड ऑफिसर एम. एस. पाटील, चेतन आरमार, दत्ता तिवले आदींसह महापालिका अधिकारी, कर्मचारी, पाचगाव ग्रामस्थ उपस्थित होते.