कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे ‘बँकींग ग्रिव्हन्स कमिटी फॉर इंडस्ट्रीज अँड ट्रेड’ ची स्थापना केली आहे. संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चेंबरच्या पदाधिकारी मिटींगमध्ये सदर कमिटीच्या चेअरमनपदी संचालक विज्ञानंद मुंढे यांची एकमताने नेमणूक करण्यात आली. मुंढे यांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागातील कामाच्या पध्दतीचा प्रदिर्घ अनुभव असल्याने त्यांची चेअरमनपदी निवड केल्याचे सांगितले जाते.
कोविड-१९ साथरोगामुळे उद्योजक व व्यावसायिकांच्या व्यवसायावर फार मोठा परिणाम झाल्याने चेंबरच्या सभासदांची आर्थिक कोंडी झाली असून त्यामुळे, उद्भवलेल्या समस्यांवर सक्षमपणे मात करण्यासाठी मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘बँकींग ग्रिव्हन्स कमिटी फॉर इंडस्ट्रीज अँड ट्रेड’ या कमिटीचे कार्य व उद्देश चेंबर आणि सलग्न संस्थेच्या सभासदांच्या बँकींग क्षेत्रातील कर्जविषयक समस्या, जुन्या कर्जाचे पुर्नगठन, नवीन अतिरिक्त भांडवलाची तातडीची गरज तसेच शासकीय सबसिडीमधील येणे बाकी आदी समस्यांचा अभ्यास आणि बँकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करुन केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निराकरण करणे हे प्रामुख्याने राहिल. तसेच केंद्र शासनाने घोषित केलेली सुधारीत एनपीएची शिथिल नियमावली, केंद्र व राज्य शासन यांचे नवीन अतिरिक्त भांडवलविषयक धोरण, अशाप्रकारच्या योजना लहानात लहान उद्योजक व व्यापारी यांचेपर्यंत पोहचवणे. यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये उद्योग व व्यापारला नवी भरारी व चालना मिळण्यास मदत होईल.
मुंढे स्वत:च्या अध्यक्षतेखाली चेंबरच्या संलग्न औद्योगिक संघटना व व्यापारी संघटना यातील योग्य प्रतिनिधी व इतर तज्ञ व्यक्ती यांची नियुक्ती करुन समिती गठीत करणार आहेत. त्यांच्या पुढील कार्यास कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व संचालक मंडळ यांचेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.