बारामती – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. सध्या राज्यात सर्वाधिक लक्ष बारामती मतदार संघाकडे आहे. कारण बारामती संघातून शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची लढत सुरु आहे. त्यामुळे या नणंद भावजय मध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये प्रथमच दोन सभा होत आहेत. एका बाजूने अजित पवार यांची सुनेत्रा पवार यांच्यासाठी सांगता सभा होत आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार पक्षाची सांगता सभा होत आहे.

या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे यांनी जाहीरसभेतून अजित पवार यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका खासदार सुप्रिया सुळे यांच्या चांगलीच मनाला लागली आहे. सुप्रिया सुळे यांनी अजितदादा यांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते एक वाक्य बोलले होते. समोरचे येतील, भावूक होतील. म्हणतील, त्यांचं शेवटचं इलेक्शन आहे आणि रडतील. मला त्यांना सांगायचं हे इलेक्शन पहिलं दुसरं की शेवटचं हा निर्णय तुमचा नसेल. तर माझ्या पांडुरंगाचा असेल. तुमच्या या बुरसटलेल्या विचाराच्या आम्ही नांदी लागणार नाही, असं म्हणत अजित पवारांवर सुप्रिया सुळे यांनी हल्ला केला .

शरद पवार दिवसातून तीन चार सभा करतात. एवढी एनर्जी येते कुठून? असं मला लोक विचारतात. मी त्यांना सांगते, त्यांच्या टॉनिकचं नाव महाराष्ट्र आहे आणि त्यांची एनर्जी मायबाप जनता आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांना साथ द्याल, तोपर्यंत त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे येऊ द्या सर्व. बोलू द्या सर्व काही. काही लोक आता व्हिडीओ दाखवत आहेत. आम्ही पवार साहेबांना संपवणार असं म्हणत आहेत. जोपर्यंत तुम्ही पवारांची ढाल आहात. तोपर्यंत कोणी मायका लाल त्यांना संपवू शकत नाही, असा इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिला. असे म्हणत बारामती येथील जाहीर सभेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला.