कळे (प्रतिनिधी ) :  केंद्रीय प्राथमिक शाळा वेतवडे ( ता.पन्हाळा )  येथे इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा कु.कौशल दिलीप माने याने वर्षभर विविध शालेय स्पर्धा परिक्षेत यश मिळवले. यासाठी त्याला एक हजार रुपये रक्कम बक्षिस मिळाली होती. कौशल याच्या वर्गशिक्षिका स्वप्नाली सुधाकर कलकुटकी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. जादा क्लासेस घेउन त्यांची चांगली तयारी करून घेतली. आपल्या वर्ग शिक्षिकेने केलेल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी कु.कौशल ने आपल्याला मिळालेली बक्षिस रुपी रकमेतून शिक्षकेला साडी भेट दिली.

कौशल च्या या संवेदनशील मनाचे परिसरात कौतूक होत आहे. कौशलने 2022-23 व 2023-2024 या शैक्षणिक वर्षामध्ये विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. BDS, समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये राज्यात चौथा क्रमांक तसेच सह्यगिरी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. या स्पर्धेचे बक्षीस ट्रॉफी, मेडल व सर्टिफिकेट असे आहे. प्रथमच सह्यगिरी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बक्षीस म्हणून ट्रॉफी सर्टिफिकेट व रोख रक्कम देण्यात आली आहे.

कौशलला बक्षीस म्हणून रोख एक हजार रुपये मिळाले. त्या बक्षिसाच्या पैशातून त्याने आपल्या आवडत्या शिक्षिकेला गुरुदक्षिणा म्हणून साडी भेट दिली आहे. मिळालेल्या पैशातून खाऊ खाण्याच्या वयात त्याने साडी भेट देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यासाठी त्याला वडील डॉ.दिलीप माने, लता माने यांचे सहकार्य मिळाले. मराठी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक जिव्हाळ्याचं नातं असतं. शाळेतील बाई म्हणजे मुलांसाठी त्या आईसमान असतात. याचं सुंदर उदाहरण इथे पाहायला मिळालं.