जयसिंगपूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनावरांच्या  संसर्ग वाढताना दिसत आहे. शिरोळ तालुक्यात सध्या १५ जनावरांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत. या जनावरांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. पशुवैद्यकीय विभागाने याबाबत पशुधन मालकांमध्ये जनजागृती करून या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आदेश आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले. 

जयसिंगपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट देऊन शासनाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी आणि संबंधित डॉक्टरांशी विस्तृतपणे यड्रावकर यांनी चर्चा केली. जनावरे चारा, पाणी कमी खाणे, ताप येणे डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येणे, जनावरांच्या अंगावर दहा ते वीस मि.मी.च्या गाठी उठणे, दूध कमी देणे, काही जनावरांमध्ये पायाला सूज येऊन लंगडणे अशी लक्षणे या रोगांमध्ये जाणवतात.

लंपी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव डास, गोचीड, चावणाऱ्या माशाबाधित जनावरांचा स्पर्श व दूषित चारा-पाणी यापासून होतो असे सांगताना आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेतकऱ्यांनी याबाबत दक्ष राहावे व आपल्याकडील जनावरांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांशी व शासनाच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असेही सांगितले. जनावरांमध्ये दिसणारा हा त्वचारोग गाईंमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो. म्हशींना यांची लागण कमी प्रमाणात होते, तरीही शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.

शिरोळ तालुक्यामध्ये सध्या २५००० वर गाई आहेत. त्यांना लवकरच लसीकरण केले जाईल. शासनाकडून लस उपलब्ध करून देण्याबाबत डॉ. शिंदे यांनी आ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याकडे विनंती केली. यावर आमदार यड्रावकर यांनी वरिष्ठ पातळीवर तातडीने लस उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना आदेश दिले. त्वचारोगबाधित जनावरांना हाताळताना अथवा दूध काढताना मास्कचा व हॅन्डग्लोजचा वापर करावा, नंतर हात स्वच्छ साबणाने धुवावेत, बाधित जनावरांचे दूध उकळल्याशिवाय पिऊ नये, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. बैठकीस गटविकास अधिकारी शंकर कवितके, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. कुरुंदवाडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाकडील डॉक्टर उपस्थित होते.