कोल्हापूर : कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली.यानंतर  आज महाविकास आघाडीच्या युवा नेते कोल्हापुरात येत आहेत. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर पाटील,आमदार रोहित पवार यांच्या आज तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या या युवा नेत्यांच्या सभा कोल्हापूर लोकसभा तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील उपस्थित राहणार आहेत. आदित्य ठाकरे यांची पहिल्यांदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ पेटवडगावमधील नगरपालिका चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे. यानंतर कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ हिंदमाता तालीम चौक उंचगाव येथे जाहीर सभा होणार आहे.

रोहित पाटील यांची आज सायंकाळी सहा वाजता शाहू महाराजांच्या प्रचारार्थ बजाप माजगावकर तालीम शेजारी, पापाची तिकटी परिसरात प्रचार सभा घेणार आहेत. यानंतर सायंकाळी आठ वाजता कदमवाडी चौकामध्ये त्यांची प्रचार सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ 1 मे रोजी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची इचलकरंजीत  सभा होणार आहे. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा याच दिवशी सायंकाळी पाच वाजता थोरात चौकामध्ये होणार आहे. एकाच दिवशी दिग्गजांच्या सभा होणार असल्यान शहरात या सभांची चर्चा सुरु आहे.