मुंबई ( वृत्तसंस्था ) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 वर्षासाठीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.

पुरस्कार घोषणा झाल्यानंतर यावर प्रतिक्रीया देताना सराफ म्हणाले ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. आणि तो मला जाहीर झाला याचा मला अतिशय आनंद आहे. मला एका मोठ्या स्थानावर नेऊन बसवल्याचा आनंद होतोय. वयाची पन्नास वर्षे माझी इंडस्ट्रीतील सत्कार्णी लागली असल्याचा आनंद झाल्याचे ही ते यावेळी म्हणाले.