असित बनगे : कोल्हापूर
सोनियाची उगवली सकाळ
उगवली सकाळ, जन्मास आले भीमबाळ
खरचं आजचा दिवस 14 एप्रिल हा समस्त दीन दलितांसाठी,शोषित वर्गासाठी, हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या वंचितांसाठी सोन्याचाच दिवस होता. कारण त्यांच्या उद्धारकाने आज जन्म घेतला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला. सुभेदार रामजी हे बाबासाहेबांचे वडील तर भीमाबाई ही आई.बाबासाहेब हे सुभेदार रामजी आणि भीमाबाई यांचे 14 वे अपत्य. इ.स. 1896 मध्ये मस्तकशूल या आजाराने बाबासाहेबांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी बाबासाहेब 5 वर्षाचे होते.यानंतर बाबासाहेबांची आत्त्या मीराबाई यांनी बाबासाहेबांचे संगोपन केले.बाबासाहेबांना कोणी निष्णात कायदेपंडित तर कोणी महान अर्थतज्ञ म्हणून ओळखतात.बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विषयाचे ज्ञान नव्हते असे नाही ते सर्व विषयात पारंगत होते.बाबासाहेब म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.
विद्यार्थी बाबासाहेब :
बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःला कायमच एक विद्यार्थी समजत असत.व्यक्ती कितीही शिकला तरी त्याचे शिक्षण संपत नाही अशा विचाराचे कदाचित बाबासाहेब असावेत. म्हणूनच बाबासाहेबांनी शिकणं कधी थांबवलं नाही. बाबासाहेबांनी विद्यार्थी दशेत असताना अभ्यास केला, शिक्षण घेतले. ते प्राध्यापक झाल्यावरही त्यांनी शिकणं थांबवल नाही. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता तेही कायमच शिकत राहिले. बाबासाहेबांनी जगभरातील मोठमोठ्या लेखकांची पुस्तके चाळली.अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. बाबासाहेब पुस्तक प्रेमी होते म्हणूनच त्यांनी पुस्तकांसाठी राजगृह बांधलं.
अर्थतज्ञ बाबासाहेब :
बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.बाबासाहेबांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: ‘ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण’, ‘ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती’ आणि ‘द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन’ या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे.
आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन 1925 साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन 1935 साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.
राजकारणी बाबासाहेब :
आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. 1919 पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. 1956 पर्यंत म्हणजे अगदी त्यांच्या महापरिनिर्वाण पर्यंत त्यांनी अनेक राजकीय पदे भूषवली.डिसेंबर 1926 मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते 1936 पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.
अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. 1930 मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे रूपांतर पुणे करारात झाले.
‘कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.’ हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,’ असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली. सन 1942 पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.
पत्रकार बाबासाहेब :
बाबासाहेब प्रभावी पत्रकार व संपादक होते. वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण 5 वृत्तपत्रे सुरू केली.त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.
31 जानेवारी 1920 रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले. यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. 3एप्रिल, इ.स. 1924 रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी 29 जून 1928 रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. 24 फेब्रुवारी 1930 रोजी त्यांनी जनता तर 4 फेब्रुवारी 1956 मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. 1944 मध्ये आंबेडकरांनी “आम्ही शासनकर्ती जमात बनणार” या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची पत्रकारिता प्रभावी होती. आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे. त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली.
स्त्री उद्धारक बाबासाहेब :
भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.
भारत स्वतंत्र झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वातंत्र्य होते परंतु विधवा दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.हिंदू कोड बील प्रथमतः 1 ऑगस्ट 1946 रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर 11 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले. हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्क मिळवून दिला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार हिंदू कोडबीलात बाबासाहेबांनी मांडला.
खाद्यप्रेमी बाबासाहेब :
बाबासाहेब आंबेडकरांना बहुतांशी लोक राजनितीतज्ञ ,अर्थतज्ञ म्हणून ओळखतात पण बाबासाहेब आंबेडकर हे एक खाद्यप्रेमीही होते हे फार कमी लोकांना माहित आहे.बाबासाहेबांना मटणाचे कालवण खूप आवडत होते.ते स्वतः कालवण बनवत. तसेच बाबासाहेबांना बोंबलाची चटणी आणि भाकरी अतिशय प्रिय होती.ते जेंव्हा नोकरी करीत होते तेंव्हा डब्यातूनही बोंबलाची चटणी भाकरी घेऊन जात.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब :
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , संविधान निर्माता म्हणून संबोधले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय मसुदा समितीचे अध्यक्षही होते. बाबासाहेबांनी जगभरातील सर्व देशांच्या राज्यघटनांचा सारासार अभ्यास करून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना पूर्णत्वास नेण्याचे महान कार्य केलं. बाबासाहेबांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना राज्यघटनेत पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. असे विविधांगी बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पाहायला मिळतात.बाबासाहेब ज्ञानाचा अथांग सागर होते. आज बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या या जयंतीदिनी विनम्र अभिवादन.