सोलापूर/प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीकडून येणारे प्रस्थावांवर प्रस्ताव आणि अटी शर्थींमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीने अखेर वंचित बहुजन आघाडीशिवाय महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. यात ठाकरे गट सर्वाधिक जागा लढणार आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे ह्या सोलापुरात गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर नाव न घेता टीका केली आहे. याला वंचित आघाडीने त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं आहे. वंचितने काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांचा भाजपच्या पोस्टरवर फोटो लावत वंचितने ताई; नवीन पक्षात प्रवेश कधी? असा सवाल केला आहे.

एकीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसोबत युतीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. अशातच आता काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांचा भाजपच्या पोस्टरवर फोटो लावत वंचित आघाडीने जोरदार टीका केली आहे. तसेच भाजप प्रवेशाचा मुहूर्त कधी? असा खोचक सवालही उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे
“मागील निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान झालं होतं. जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो, तो भाजपला मदत करतो, डॅमेज करतो. त्यामुळे कोणीही निवडून येत नाही. ज्यामुळे जो विरोधात आहे तो निवडून येतो. म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका,” असं आवाहन करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केलाय. आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी कॉर्नर बैठकांचा धडाका लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील येणकी गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर नाव न घेता टीका केली आहे.

वंचितकडूनही जोरदार प्रत्युत्तर
प्रणिती शिंदेच्या या टिकेनंतर वंचित बहुजन आघाडीने देखील प्रतिउत्तर दिलंय. “ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक. आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी किंवा जनतेच्या पैशाने दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही. आम्ही महाराष्ट्रातील वंचित – बहुजनांच्या आकांक्षा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुका लढवतो. असो, या सर्व गोष्टी बंद करा. तुम्ही ठीक आहात? आम्हाला समजले आहे की, इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचे तुमच्या पक्षासोबत जमत नाही. नवीन पक्षाचा मुहूर्त कधी आहे?” असे प्रतिउत्तर वंचित बहुजन आघाडीने x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिले आहे.