सांगली : महाविकास आघडी आणि महायुतीमध्ये अजूनही काही ठिकाणी लोकसभेच्या जागेवरून तिढा कायम आहे. उमेदवारी न मिळाल्याने काही ठिकाणी नेत्यांनी बंडखोरी केली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून कॉंग्रेसमध्ये नाराजी आहे. सांगलीची जागा शिवसेनेला गेल्याने कॉंग्रेस नेते विशाल पाटील नारज असून त्यांनी बंडखोरी केली आहे. ते लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, शिवसेना भवनात नुकताच शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे नवीन गीत लॉन्च केले. तसेच, सांगली लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. “जागावाटपानंतरही जर कोणी बंडखोरी करत असतील निवडणूक लढवत असतील तर त्याचा फटका बसणार नाही. संपूर्ण देशात हुकूमशाही विरोधात एक जनमत तयार झाले असून ते फक्त मतदानाची वाट पाहत आहेत. त्यामुळे मी काही यावर बोलणार नाही. कारण जागावाटप झालेला आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये जागावाटप जाहीर केले. त्यानंतर आता जर कुठे बंडखोरी होत असेल तर, त्या-त्या पक्षाची जबाबदारी आहे. जर बंडखोरी झाली तर, जनता त्यांना स्थान देईल, असे वाटत नाही”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता विशाल पाटलांच्या भूमिकेवर टीका केली.

“ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे. देश वाचविण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन करतोय. आव्हान हुकूमशाहीला आणि आवाहन जनतेला असेल. माझे टार्गेट 48 आहे आणि आम्ही 48 जागा जिंकू”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.