मुंबई ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची ओळख असलेला दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

मात्र, गतवर्षी शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये फूट पडल्याने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. यानंतर अखेर ठाकरे गटाने ही कायदेशीर लढाई जिंकली आहे.


यंदा पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात कायदेशीर लढाई होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेल्या सौहार्दपूर्ण दृष्टिकोनामुळे ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


प्रत्यक्षात यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या जागेची मागणी करत ठाकरे गट आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशावरून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका मागे घेण्याची तयारी सुरू केली आहे. शिवाजी पार्कचे मैदान दसरा मेळाव्यासाठी घेण्यासाठी आमदार सदा सरवणकर यांनीच पालिकेकडे अर्ज केला होता.


‘मी अर्ज मागे घेईन’

मात्र, मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सदा सरवणकर यांनी हा अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मी अर्ज मागे घेणार आहे. त्याऐवजी आम्ही क्रॉस मैदान, आझाद मैदानासाठी पालिकेकडे अर्ज सादर केला आहे.