गाझीपूर (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये गंगा नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला आहे. इंजिनवर चालणाऱ्या या बोटीमध्ये सुमारे २५-३० लोक बसले होते. बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे २२ जणांचे प्राण वाचवले, मात्र यातील पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. त्याचवेळी नाविकाने उडी मारून आपला जीव वाचवला.

रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अठहठा गावात हा अपघात झाला आहे. पुरामुळे संपूर्ण गाव पाण्यात बुडाले. ज्यामुळे प्रशासनाने गावकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी इंजिनवर चालणाऱ्या बोटी उपलब्ध करून दिल्या. या बोटीच्या माध्यमातून गावकऱ्यांना गावाबाहेर काढले जात होते. यावेळी बुधवारी सुमारे ३० जणांना नौली गावात स्थलांतरित केले जात होते, मात्र सायंकाळी परतत असताना हा अपघात झाला. या अपघातावेळी बोटीत सुमारे १५ पुरुष, १० महिला आणि ५ मुले होती.

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा दंडाधिकारी एम.पी.सिंग आणि पोलीस अधीक्षक रोहन पी. बोत्रे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या गोताखोरांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.