कोल्हापूर (प्रतिनिधी) : गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या आणि या पिस्तूलचा पुरवठा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज (शुक्रवार) अटक केली. शिवाजी उर्फ संतोष नामदेव पाटील (वय २८, रा. कंदलगाव ता. करवीर) आणि संदेश उर्फ रोहित शामराव पाटील (वय २९, रा. कोलोली ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत राऊंड असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कंदलगाव येथील शिवाजी पाटील यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एक पथक तयार करून शिवाजी पाटील यांच्यावर पाळत ठेवली होती. काल (गुरुवार) रात्री शिवाजी पाटील हा त्याच्याकडील गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आर. के. नगर परिसराततील चित्रनगरी जवळ येणार असल्याची माहिती सावंत याना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला होता.
त्यावेळी या गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या शिवाजी उर्फ संतोष पाटील याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत राऊंड, एक मोटर सायकल असा १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही पिस्तूल शिवाजी पाटील याने पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील संदेश उर्फ रोहित पाटील यांच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी संदेश उर्फ रोहीत पाटील यालाही अटक केली.
न्यायालयाने या दोघांना पाच ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासासाठी या दोघांना गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस हवालदार अजित वाडेकर, राजेश आडुळकर यांनी केली.