कोल्हापूर (प्रतिनिधी) : निसर्गात असणाऱ्या विविध प्रकारच्या रान कंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासीयांना आणि खेड्यातील ग्रामस्थांना व्हावी यासाठी ‘निसर्ग अंकुर’ च्या मार्गदर्शनाखाली दि. १२ आणि १३ जानेवारी रोजी ६० कंदमुळांचे माहितीपूर्ण प्रदर्शन दसरा चौक येथील शहाजी कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ या संस्थेच्या माध्यमातून तसेच शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब, यूथ अॅनेक्स, वुई केअर हेल्पलाईन संस्थांच्या सहकार्याने कंदमुळांचे प्रदर्शन भरविण्यात येत असल्याची अशी माहिती मिलिंद धोंड, प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘निसर्ग अंकुर’चे अध्यक्ष, ज्येष्ठ वनस्पतीतज्ञ प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर व उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक वाली यांनी लिहिलेल्या ‘औषधी रानभाज्या- प्रथम खंड’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी होणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार असून, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, कृषी अधिकारी उमेश पाटील (कोल्हापूर), प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. गीता पिल्लई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मोहन माने यांच्या प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. शतावरी, अमरकंद, सफेद मुसळी, पेनवा इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा औषधात वापर करतात. गाजर, मुळा, बीट, आले, हळद, कांदा, लसूण इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा आपण आहारात वापर करतो. अळू, कमळ, सुरण हे कंदही भाजीसाठी वापरतात. साबू कंदापासून साबुदाणा तयार करतात.

या प्रदर्शनात कणगा, काटे कणग, कोराडू, करांदा, वराहकंद, वासकंद, पासपोळी, शेंडवेल, आळसी, शेवळा, सुरण या वनस्पतींची कंदमुळे, कंदिका आणि कंदक तसेच अळूंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद, काळी हळद, आंबेहळद यासारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद इ. अशाप्रकारच्या सुमारे ६० प्रकारच्या कंदांच्या जाती प्रजातींची मांडणी प्रदर्शनात केली जाणार आहे. १५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उप्लब्ध असून, सुमारे ६ ते ७ प्रकारच्या कंदांच्या पाककृती बाबतची माहिती प्रदर्शनात दिली जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा, महाराष्ट्रातील बेल्हे (पुणे) व गगनबावडा (कोल्हापूर) येथून करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन एनजीओ कम्पेंशन २४, कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी केले आहे. हे प्रदर्शन सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे. पत्रकार परिषदेस सुशांत टक्कळकी, अमृता वासुदेवन, प्राचार्य डॉ. अशोक वाली, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, मंजिरी कपडेकर, पल्लवी कुलकर्णी, मधुरा हावळ उपस्थित होते.