शिंगणापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील रस्त्यांचे दुखणे कायम आहे. नवीन फुलेवाडी रिंग रोड चांगला झाला आहे, मात्र जुना रिंग रोड अजूनही समस्यांच्या गर्तेत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही यावर कार्यवाही झालेली नाही. याच्या निषेधार्थ क्रांतिसिंह नाना पाटील नगर विकास कृती परिषदेच्यावतीने माजी नगरसेवक अमोल माने, सुहास आजगेकर, समीर वर्णे यांनी आज (शनिवार) चक्क खड्ड्यांमध्ये अभ्यंगस्नान केले.
जुन्या रिंग रोडवरून आजही कणेरकर नगर, लक्ष्मीबाई साळोखे कॉलनी, अरुण सरनाईक नगर, निचितेनगर येथील नागरिक ये-जा करत असतात. प्रचंड खड्डे पडल्यामुळे येथे वारंवार अपघात होत असतात. नवीन रिंग रोडसह जुन्या रिंग रोडचे डांबरीकरण होणे गरजेचे होते, पण महापालिका प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. याबाबत प्रशासनाला निवेदन देऊनही कार्यवाही झाली नाही. याच्या निषेधार्थ आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी क्रांतिसिंह नाना पाटील नगर विकास कृती परिषदेच्यावतीने खड्ड्यांमध्ये अभ्यंगस्नान करण्यात आले. या वेळी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात माजी नगरसेवक अमोल गणपतराव माने, सुहास आजगेकर, समीर वर्णे यांनी सहभाग घेतला.