मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ब्रेक लागलेला दहीहंडी आणि गणेशोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही   निर्बंध असणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. मूर्तिकारांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, मूर्तींच्या उंचीवर कुठलंही बंधन नसणार असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांपासून सगळे सण साधेपणाने साजरे केले गेले; मात्र आता सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने जे निर्देश दिले आहेत, ते पाळून हे उत्सव साजरे केले जावेत, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, गणेश उत्सवाबाबत समन्वय समितीसोबत बैठक झाली. मूर्तिकारांच्या प्रतिनिधींचाही यात समावेश होता. त्यांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोविड काळात सण-उत्सवाला मर्यादा होत्या; पण यंदा मंडळांचा उत्साह आहे. हे लक्षात घेता गणेशोत्सव, दहिहंडी, मोहरम हे सण धडाक्यात साजरे व्हावेत, याबाबत बैठकीत चर्चा झाली. कायदा सुव्यवस्था राखून शांततेत उत्सव व्हावे म्हणून सर्व प्रशासन, जिल्हा आणि पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. विसर्जन मार्गातील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंडप आणि अन्य परवानगी सुरळीत मिळावी यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करत आहोत. अटी-शर्थी लावू नये, असे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, मंडळांना नोंदणी शुल्क आणि अनावश्यक शुल्कातून सूट दिली आहे. हमीपत्रही आता गणेश मंडळांकडून घेणार नाही. उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी, समाजप्रबोधनाचे नियम पाळावेत; पण त्याचे अवडंबरही प्रशासनाकडून होता कामा नये. सर्व अधिकारी, प्रशासनाने सकारात्मक भूमिका गणेशोत्सव साजरा करताना घ्यावी. विसर्जन घाटावर आणि मार्गावर विजेची व्यवस्था केली जाणार आहे.

राज्यातील हा सर्वात मोठा उत्सव आहे. त्यासाठी राज्य शासन मदत करेल. धर्मदाय नोंदणीचा प्रश्नही सोडवला असून, ध्वनी प्रदूषणाच्या किरकोळ केसेसही काढण्याच्या आणि दहीहंडीत थराच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.