मुरुड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या राजकीय सभांना सुरुवात झाली असून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहेत. मुरुडमध्ये नुकताच शेतकरी कामगार पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको असल्याचं विधान जयंत पाटील यांनी केलंय. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांची पर्वा न करता शेकापचा लाल बावटा घेऊन सर्वांनी वेगळ्या उमेदीने कामाला लागा असं आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. तसंच शेकाप कधीही संपणार नाही असा इशाराही दिला. यावेळी त्यांनी सुनील तटकरेंचा उल्लेख अजित पवारांची दुसरी पत्नी असा केला. सुनील तटकरे म्हणजे अजित दादांची दुसरी बायको असं ते म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी रायगडमधून सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर केली. सुनील तटकरे अजित पवार गटाकडून जाहीर झालेले पहिले उमेदवार आहेत. शेकापचे जयंत पाटील यांनी सभेत सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

“सुनील तटकरे यांना त्यांचे बंधू अनिल तटकरे यांनी मोठे केलं. पण सुनील तटकरे यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. आता आपल्याला सुनील तटकरे पुन्हा निवडणुकीला उभे राहणार नाहीत अशी स्थिती करायची आहे. अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे,” असा निर्धार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शेतकरी कामगार पक्ष दिलेला शब्द पाळतो. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये अनेकांवर विश्वास ठेवून त्यांना शेतकरी कामगार पक्षाने जिंकून आणले आहे. त्याच पक्षाला संपविण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने केला जात आहे पण शेतकरी कामगार पक्ष कधीही न संपणारा पक्ष आहे असं जयंत पाटील म्हणाले.