मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे.

दरम्यान उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात मागील १० वर्षांपासून भाजपच्या पूनम महाजन या खासदार आहेत. मात्र भाजपने यंदाच्या निवडणुकीसाठी अद्याप त्यांच्या नावाची घोषणा केलेली नाही. महाजन यांच्याबाबत मतदारसंघात असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवा उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. अशातच ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत आलं असून भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपकडून सुरुवातीच्या काळात पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शेलार यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवल्याने पक्षाकडून अन्य नावांवर विचार सुरू आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर आता उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.