कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांचा कोल्हापूर दौरा संपन्न झाला. पदवीधर व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राचुरे यांनी वाढीव विजबिलांच्या विरोधात आम आदमी पार्टी सातत्याने आवाज उठवत असल्याचे सांगितले. जनतेचा संयम संपत असून आता जर महाआघाडी सरकारने वीजबिल माफी बाबत निर्णय न घेतल्यास ‘आप’ येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलनास बसेल अशी माहिती दिली. या सत्याग्रह आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणार असून गावोगावी याचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांना मागील सरकारकडून कर्जमाफीची जाहीर केली गेली. यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्यात येतील असे सांगितले गेले. सरकार बदलून वर्ष उलटायला आले तरी अजून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. सरकारने त्वरित त्यांचे पैसे द्यावेत असे राचुरे म्हणाले. विधिमंडळाने देवस्थानात पगारी पुजारी नियुक्त करावेत असा अधिनियम २०१८ ला आला. परंतु राज्यात सत्ताबदल होऊन देखील अद्याप पगारी पुजारी नेमलेले नाहीत. कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरात देखील हेच झाले आहे. यावर लवकरात लवकर शासनाने त्या अधिनियमाची त्वरित करून पगारी पुजारी नेमावेत असे राचुरे यांनी सांगितले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या ‘कारभारी’ नियोजनावर टीका करत त्यांनी ‘कोल्हापुरात रस्ते होण्याआधीच त्याच्या कमिशनचे वाटप होते, असे पाकीटमार प्रतिनिधी कसे काय निवडून दिलेत’ असा खोचक टोला त्यांनी लगावला. ‘आप’ने महापालिकेवर पंचनामा मोर्चा काढून 5 वर्षांच्या कारभाराचे लेखापरीक्षण व्हावे अशी मागणी केली होती. यावर १५ दिवसात लेखापरीक्षक नेमावेत अशी मागणी करण्यात आली होती. 25 तारखेला 15 दिवस पूर्ण होत आहेत. यामध्ये जर मागणी पूर्ण न झाल्यास या मुद्द्यावर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी ‘आप’चे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. अमोल पवार यांना निवडणुकीत पदवीधरांनी विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदिप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, जयवंत पोवार, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, अमरजा पाटील आदी उपस्थित होते.