मुंबई (प्रतिनिधी) : लखीमपूर खेरी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी दिलेल्या लढ्याबाबत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी कौतुक केले आहे. सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामधून राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. तर  प्रियांका गांधींमध्ये थेट भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते, असेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. ईडी, सीबीआयसारख्या तपासयंत्रणा आज कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचं काम प्रियांका गांधी यांनी केलं. इंदिराजींचं अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा दिसलं.

लखीमपूर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवलं. धक्काबुक्की केली. बेकायदेशीररीत्या डांबून ठेवलं. इंदिरा गांधींच्या नातीला, राजीव गांधींच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना देशानं पाहिलं. प्रियांका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचं देशात अस्तित्व आहे. आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील, याची खात्री पटली असेल.

प्रियांका गांधींना सीतापूरला जबरदस्ती डांबले. त्या घाणेरड्या जागेत झाडू हातात घेऊन प्रियांका यांनी साफसफाई केली. देशात स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने एक दिवस ज्यांनी झाडू घेऊन फोटो काढले, त्या लाखो फोटोंवर प्रियांका गांधींच्या एका झाडूने मात केली, असा टोलाही राऊत  यांनी पंतप्रधान मोदींना यांना या लेखातून लगावला आहे.