टोप (प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकबाकी भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व सरपंचांनी महावितरणविरोधात सुरू केलेल्या लढ्याला यश आले आहे.

राज्यातील पथदिव्यांची मागील थकबाकी व चालू वीज देयके भरण्यासाठी राज्य शासन  जिल्हा परिषदेला अनुदान पाठवणार आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडे अनुदान पाठवून प्रतिमहिना मागील व चालू वीज देयके अदा केली जातील. याबाबतचा आदेश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी दिला आहे.

दरम्यान, राज्यातील सरपंच यांनी पथदिव्यांची वीज कनेक्शन तोडू नये, यासाठी उपोषण केले होते. त्या उपोषणाला आता यश आले असल्याचे दिसत आहे.  ग्रामविकास विभागाने याबाबत शासन निर्णय निर्गमित करुन राज्यातील पथदिव्यांची वीज देयके भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.