मुंबई : पुण्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. यानंतर पंतप्रधान मोदींच्या या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पुढे सरसावले आहेत. मोदींच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी पुण्यात झालेल्या जाहीर सभेत ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख करत शरद पवार यांना लक्ष केलं होतं. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पंतप्रधानांवर टीका करायला सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, पवित्र आत्मा म्हणतो अशा लोकांचा हा प्रदेश आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. काल मोदी पुण्यात होते, त्यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख तरी केला का? अशा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत म्हणाले की, कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राग आहे. त्यांना डॉ. आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे. म्हणून त्यांचे आत्मे बदलायचे आहे.
म्हणून त्यांचे आत्मे महाराष्ट्रात भटकतायत. डॉ. बाबासाहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं संविधान भाजपाला बदलायचं आहे. त्याविरोधात शिवसेना त्याविरोधात ठामपणे उभी आहे, असा इशारा संजय राऊत यांनी केला.

मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, मोदी आम्हाला म्हणतात ना भटकते आत्मा. उद्या 1 मे आहे. उद्याच्या दिवशी 105 आत्मे ज्यांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं ते उद्या मोदींना शाप देणार आहेत. कारण मोदींनी जितकं महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नुकसान केलं आहे. तेवढं आतापर्यंत कोणी केलं नसेल. त्याच्यामुळे या अतृप्त आत्म्याविरुद्ध ही महाराष्ट्राची लढाई आहे. उद्या महाराष्ट्र दिन आहे, उद्या 1 मे आहे. आम्ही सगळे 105 हुताम्यांना, या पवित्र आत्म्यांना उद्या आंदराजली वाहू आणि त्यांना सांगू की जे आत्मे महाराष्ट्रविरोधी भटतकायत आम्ही त्यांचा बदला घेऊ, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

मोदींनी सभेत संजय राऊत यांना बडबोले नेते म्हणून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, मोदींना सांगा आमच्याकडे 5 चेहरे असले तर काय झालं, तुमच्यासारखा एकच भटकता आत्मा प्रधानमंत्रीपदावर बसला तर या देशाची आणि राज्याची भुताटकी होऊन जाईल, स्मशान होईल. आमच्याकडे प्रधानमंत्रीपदासाठी 105 चेहरे आहेत आणि हे लोकशाहीतलं सगळ्यात चांगलं आणि उत्तम उदाहरण आहे. एका लोकशाहीप्रधान देशामध्ये प्रधानमंत्रीपदासाठी फक्त एक चेहरा नाही, तर एकापेक्षा जास्त चेहरे आहेत आणि उत्तम चेहरे आहेत. लोक ज्याला स्विकारतील तो प्रधानमंत्री होईल, आम्ही भाजपाप्रमाणे प्रधानमंत्री लादणार नाही, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.