इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीची पाणीपातळी अवघी एक फुटाने वाढल्यास जुना पुलावर पाणी येणार आहे. पाणीपातळी संथगतीने वाढत असून, हा पूल लवकरच पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सध्या हा पूल वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

येथील पंचगंगा नदीची नदीच्या वरील बाजूस असलेल्या ओढे व नाल्यातून अजूनही पाणी वाहत नसल्याने नदीची पाणीपातळी संथगतीने वाढत आहे. मंगळवारी संध्याकाळी पंचगंगेची पाणीपातळी ही ५९.९ फूट इतकी होती. नदीच्या जुन्या पुलावर पाणी येण्यासाठी ६१ फूट इतक्या पाणी पातळीची आवश्यकता आहे. मंगळवारी नदीची पाणीपातळी केवळ सहा इंचाने वाढली होती.

दरम्यान, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे प्रमुख संजय कांबळे हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह नदीघाटावर ठाण मांडून बसले आहेत. नदी घाटावर फायर फायटर, यांत्रिक बोटीसह कर्मचारी व पट्टीचे पोहोणारे २४ तास तैनात केले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.