कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंचगंगा स्मशानभूमी विस्तारीकरणासाठी आमदार सतेज पाटील व आमदार जयश्री जाधव यांनी १ कोटी रुपये देऊ केले आहेत. महापालिकेनेही स्वनिधीतून पंचगंगा स्मशानभूमीच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपयाची तातडीने तरतूद करावी अशी सूचना आ. जयश्री जाधव आणि आम ऋतुराज पाटील यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिल्या.

पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी आ. सतेज पाटील, आ. जयश्री जाधव यांनी १ कोटी रुपये देऊ केले. या निधीतून १२ बेडचे स्वतंत्र शेड उभारला जाणार आहे. आणखी १ कोटींचा निधी महापालिकेने उपलब्ध करून द्यावे, आशा सूचना आ. सतेज पाटील यांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आ. ऋतुराज पाटील आणि आ. जयश्री जाधव यांनी प्रशासक कादंबरी बलकवडे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आयोजित केली होती.

या बैठकीमध्ये जुन्या शेडची उंची वाढवणे गरजेचे असल्याचा मुद्दा कार्यकर्ते प्रकाश नाईकनवरे यांनी उपस्थितीत केला. सुशोभीकरणाचा विषय पुढे आला असता दोन वर्षांत ३० लाख रुपये खर्च झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु हा निधी नेमका कुठे खर्ची  झाला, असा प्रश्न शारगंधर देशमुख यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांना यावर समाधानकारक उत्तर देता आले नाही. जिल्हा नियोजन समिती आणि आमदार निधीतून स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी निधी प्राप्त होऊ शकतो, असे उपशहर अभियंता नारायण भोसले यांनी सांगताच महापालिका केवळ जनतेकडून टॅक्सच गोळा करणार आहे का नागरिकांना सेवा कांही देणार की नाही, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.

या बैठकीला महापालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, अश्किन आजरेकर, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, प्रताप जाधव उपस्थित होते.