मुरगुड (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित करू नये, अशी विनंती आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशजांना केली होती. परंतु, आमची ही विनंती धुडकावत त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिवशीच ती पवित्र भूमी कलंकित केली. ती पुन्हा पवित्र करण्यासाठी उद्या (मंगळवार)  त्याठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडून त्यांनी कलंकित केलेली ही भूमी पवित्र करणार आहोत, असे पत्रक मुरगूड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढले आहे.     

पत्रकात म्हटले आहे की, राजर्षि शाहू महाराजांची जयंती दि. २६ जुलै रोजी झाली. यावेळी मुरगूडच्या जनतेला पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करायला लावणारे हे छ. शाहूंचे जनक वशंजांना त्या पवित्र भूमीत पाय ठेवू नये, अशी विनंती केली होती. परंतु, आमची विनंती धुडकावत त्यांनी ती भूमी कलंकीत केली. त्यामुळे उद्या तिथे गोमूत्र टाकून ती भूमी पवित्र करणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

या पत्रकावर माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगुले, नगरसेवक रविराज परीट, राष्ट्रवादीचे मुरगूड शहराध्यक्ष रणजीत सूर्यवंशी, डॉ. सुनील चौगुले, कॉ. अशोक चौगुले, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य राजू आमते, माजी नगरसेवक नामदेव भांदीगरे, संजय मोरबाळे, जगन्नाथ पुजारी आदींच्या सह्या आहेत.