कोल्हापूर (राजा माने) : माझ्या जीवनात लहानपणापासून मी क्रिकेटबद्दल किती वेडा राहिलो आहे, हे माझे मित्र जाणतातच. मागच्या महिन्यात छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात १९८५-८६साली गंगापूरच्या स्फूर्ती क्लब आणि एलोरा स्टिल कंपनीच्या टीमकडून खेळत होतो त्या टीममधील सहकारी शिवाजी कान्हे यांच्या घरी भेट दिली. शिवाजी आणि त्याच्या ज्या आस्थेवाईकपणे आणि जिव्हाळ्याने पाहुणचार केला, त्याला तोडच नव्हती.


तो क्षण अविस्मरणीय ठरविण्यासाठी माझा खास आवडीचा विषय असणारे “जॅकेट व ब्लेजर” मला शिवाजीने मला भेट तर दिलेच. पण ते मला फोटोत तुझ्या अंगावर दिसले पाहिजे, अशी अटही घातली. मला अगदी शतक ठोकल्याचा आनंद झाला. या क्षणाचे साक्षीदार होते गंगापूरच्या स्फूर्ती क्लबचे संस्थापक आणि आमच्या त्यावेळच्या टीमचे दुसरे मेंबर बाळासाहेब सातपुते,माझे बालपणापासूनचे मित्र गायक सूर्यकांतदादा वायकर व कवी सोमेश्वर घाणेगावकर हे त्या अनमोल क्षणांचे साक्षीदार होते.


त्या क्षणाची आज आठवण व्हायलाही कारण घडले ते परभणीच्या स्फूर्ती क्रिकेट क्लबचे संस्थापक संतोष बोबडे…सन १९८७-८८ साली मी याच टीममधून खेळत होतो. त्या टीममध्ये संतोष बोबडे होता व अर्थातच जिवाभावाचा आयुष्यभराचा मित्र झाला. तो आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सहसचिव आहे. पुण्याच्या एम.सी.ए. स्टेडियममध्ये सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील एखादी मॅच त्याच्यासोबत आम्ही सहकुटुंब थाटात पहावी,हा त्याचा प्रेमाचा हट्ट…मागच्या आठवड्यात न्यूझीलंड – दक्षिण आफ्रिका मॅचने तो योग आणला. मी सोलापूरचे आमचे मित्र प्रा. देवानंद चिलवंत आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सामना समन्वयक राजू काने सौभाग्यवतींसह दाखल झालो.


यजमान श्री व सौ.संतोष बोबडेंनी आमचा जबरदस्त पाहुणचार केला. त्यावेळी मी आठवणीने शिवाजी कान्हे याने भेट दिलेला ब्लेजर अंगावर चढविला होता. क्रिकेटच्या वेडातील माणसं एकदा जोडली गेली की तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असा नाते अतूट राखतात.खरं तर व्ही.व्ही.व्ही.आय.पी.कक्षातून विश्वचषक स्पर्धेतील मॅच पाहण्याच्या अनुभवावर खूप खूप लिहिण्याचा मोह होतोय, पण तो आवरतो.. तुर्तास माझे मित्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे यांच्या कर्तबगारीला,थाटाला आणि श्री व सौ. बोबडेंच्या पाहुणचाराला सलाम….

(राजा माने, संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.)