बेळगाव ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण? याची चाचपणी सुरु असताना जनतेला काय वाटते याचा आढावा घेतला असता सध्या शेट्टर सासरे सुन या फॉर्मुल्यात भाजपने अडकणे नुकसानदायक ठरू शकते असे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपाला विजय मिळवायचा असल्यास सर्वसमावेशक चेहऱ्याची गरज आहे. अन्यथा या जागेवर पाणी सोडावे लागेल असे वातावरण निर्माण झाले आहे.


माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघात स्वतःला किंवा आपल्या सुनेला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच मुद्द्यावर काँग्रेसमध्ये गेलेले शेट्टर परत आले आहेत. धारवाड हुबळी मध्ये त्यांना तिकीट मिळत नाही. मग आपले व्याही चार वेळा आणि विहीण बाई पाचव्यांदा निवडून आलेल्या भागात तिकीट द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

मात्र स्थानिक भाजप कार्यकर्त्यात यामुळे असंतोष आहे. जगदीश शेट्टर किंवा श्रद्धा शेट्टर हे उमेदवार झाल्यास भाजपचे कार्यकर्तेच भाजप सोबत राहतील कि नाही ही मोठी शंका आहे. सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मंगला यांना संधी देऊन पाहिले आता पुन्हा त्यांच्याच घरात महिला म्हणून तिकीट द्यावे अशी मागणी केली.

जात असून ती हास्यास्पद ठरत आहे. काहीच काम न करता वारंवार जागा अडवणाऱ्यांना यावेळी तिकीट देऊ नका ही कार्यकर्त्यांची स्पष्ट मागणी आहे.
सध्या स्थानिक दोन इच्छूकांमध्ये माजी आमदार संजय पाटील यांच्यासाठीही मागणी जोर धरत आहे. दिल्लीत निर्णय होणार असल्याने अंगडी आणि शेट्टर कुटुंबीय दिल्लीत आपले वजन वापरत आहेत.

मात्र त्यांच्या बाजूने कौल दिला गेल्यास पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते नाराज होणार आहेत. पक्ष आणि मोदी या चेहऱ्यावर भाजपचे निवडणुकीचे गणित ठरलेले असले तरीही बेळगावात आपला माणूस मोदींचे हात बळकट करण्यास हवा आहे. मराठी आणि कन्नड माणसांची हीच मागणी आहे.


महांतेश कवटगीमठ हे दुसरे इच्छूक जोरदार प्रयत्न करीत असले तरी त्यांनाही निवडून येणे कठीण आहे. त्यांचीच माणसे त्यांचा अरुण शहापूर करण्यास टपून बसली आहेत. यामुळे कवटगीमठ यांना तिकीट देणे पक्षाला महागात पडू शकते. लिंगायत संघटनेवर वर्चस्व असलेल्या संघटनेच्या प्रमुख व्यक्तीकडूनच त्यांना धोका होण्याची दाट शक्यता आहे.

तिकीट मिळवून देऊन पाडावयाची गणिते सुरु झाली असल्याने आता शेट्टर आणि कवटगीमठ हे उमेदवार भाजपच्या बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे ठरणार असे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे. यामुळॆच निवडून येणारे एक आश्वासक नाव म्हणून संजय पाटील हा चेहरा पुढे आला आहे. हिंदुत्वाचे नाव, मराठी आणि कन्नडचे समन्वय साधणारा नेता म्हणून भाजप कार्यकर्ते आणि जनतेची पहिली पसंद संजय पाटील ठरत आहेत.