देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तळवडे झाजमतर खाडीत जयदीप पांडुरंग घाडी या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (गुरुवार) घडली. जयदीप पांडुरंग घाडी (वय २३, रा. तळवडे घाडीवाडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील तळवडे घाडीवाडी येथील जयदीप घाडी हा आपल्या चार मित्रांसोबत काल सायंकाळच्या सुमारास तळवडे झाजमतर खाडीतून वाणीवडे येथे पोहत जात होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोघेजण बुडू लागले. बुडताना त्यांनी आरडाओरड केल्यामुळे खाडीकिनारी मच्छीमार करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थानी बोटीच्या सहाय्याने यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये एकाला वाचविण्यात यश आले. मात्र. जयदीप हा सापडला नसल्याने त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. काल रात्री साडेबाराच्या सुमारास झाजमतर किनाऱ्यालगत त्याचा मृतदेह तरंगताना दिसला. याबाबतची फिर्याद जयदीपचे वडील पांडुरंग घाडी (वय ६०)यांनी देवगड पोलिसात दिली असून पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा रीतसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.