कोल्हापूर (प्रतिनिधी) : उत्तम प्रतीच्या चवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे. विशेष म्हणजे आता, गोकुळ दूध संघाच्या गायीच्या दुधाचे तूप आता मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जाणार आहे. गायीच्या दुधाच्या तुप घेऊन गोकुळचे वाहन मुंबईकडे रवाना झाले. तसेच यावर्षी सिद्धीविनायक मंदिरासाठी 250 मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार असल्याचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी सांगितले.

आज (शुक्रवार) अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर अरुण डोंगळे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले. गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

यावेळी अरुण डोंगळे यांनी, सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिध्द मंदिर असून महाराष्ट्र तसेच बाहेरील लाखो भाविक भेट देत असतात. त्यांना ट्रस्टमार्फत प्रसाद दिला जातो. या सिद्धिविनायकाच्या प्रसादात ‘गोकुळ’चे तूप वापरले जाणार आहे. हे गोकुळचे मोठे भाग्य आहे. गोकुळला वर्षभरामध्ये एकूण २५० मेट्रिक टन गाय तूप सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टला पुरवठा करावयाचे आहे.

गोकुळ प्रकल्पाची तूप उत्पादनाची क्षमता व त्याची गुणवत्ता उच्चतम असून यामुळेच गोकुळला हा पुरवठा करण्याबाबत आदेश प्राप्त झालेला आहे. यामुळे गोकुळ आणि सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये ऋणानुबंध जोडले जातील यामुळे गोकुळची मूल्यवृद्धी होण्यास मदत होणार असल्याचे डोंगळे यांनी सांगितले.

यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग महा.व्यवस्थापक जगदीश पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील,प्रकाश आडनाईक, हिमांशू कापडिया, लक्ष्मण धनवडे, उपेंद्र चव्हाण जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.