कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका व महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र याचे एक युनिट धरुन येथील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी आज (सोमवार) व्यापारी संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. राज्य शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी हा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात येईल, असा निर्णय आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.        

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी व्यापारी संघटनेच्या मागण्यांबाबत बैठकीत माहिती दिली. जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या, मागील दहा दिवसांत झालेल्या आरटीपीसीआर चाचण्या तसेच या भागाचा बाधित दर आदी माहिती महानगरपालिकेने सादर करावी, जेणेकरून ही माहिती या प्रस्तावासोबत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाला सादर करता येईल. प्राधिकरणातील गावांची माहिती देखील तयार ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या. याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. स्तर ४ चे निर्बंध कोल्हापूरप्रमाणे इतर ६ जिल्ह्यांनाही लागू असल्याने त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बंदी आदेशांचे उल्लंघन केल्यास किंवा उल्लंघन करण्यास प्रोत्साहन दिल्यास कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

या वेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.