पुणे (प्रतिनिधी) : यंदाच्या आषाढी वारीवरून सरकार आणि वारकरी संप्रदाय यांच्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. आता सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. देहू आणि आळंदीत प्रस्थानासाठी १०० वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी ५० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत पायी वारीसाठी परवानगी देण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पवार यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, आता सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. देहू, आळंदीत प्रस्थानासाठी रवाना होतील. मानाच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात 50 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यावर्षीही पालखी सोहळा बसमधूनच होणार आहे. पंढरपूरपर्यंत पायी वारी यावर्षीही होणार नाही. मात्र यावर्षी दोन बसेस पालखी सोहळ्यासाठी देण्यात आल्या आहेत. इतर वारकरी मात्र दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. मंदिर अन्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद असेल, असा निर्णय घेतला आहे.