कळे (प्रतिनिधी) : गेल्या २० वर्षापासून धामणी धरणग्रस्तांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ केली जात आहे. तरी याबाबत २० डिसेंबरपर्यंत  प्रशासनाने पाठपुरावा करून कार्यवाही करावी. अन्यथा २१ डिसेंबररोजी राई येथील धामणी मध्यम प्रकल्प ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धरणग्रस्त चालत येऊन  आंदोलन करतील, असा इशारा राई येथील श्रमिक मुक्ती दल धामणी धरणग्रस्त संघटनेने दिला आहे.

याबाबत उपविभागीय अधिकारी राधानगरी, कार्यकारी अभियंता कोल्हापूर, आमदार प्रकाश आबिटकर, तहसीलदार राधानगरी, पोलीस निरीक्षक राधानगरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गगनबावडा, पन्हाळा व राधानगरी या तीन तालुक्यातील ४० गावांचा समावेश असलेल्या धुंदवडे व धामणी खोऱ्यात हरितक्रांती घडविणाऱ्या राई येथील धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामास १६ नोव्हेंबर २००० रोजी सुरुवात झाली. मात्र, निधीअभावी हा प्रकल्प अर्ध्यावरच रखडला आहे. तसेच धरणग्रस्तांनाही कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून गट नं. ९९ मध्ये वसाहत क्र.१ तसेच गट नं. ८३ मध्ये वसाहत क्र.२ मध्ये नवीन वसाहती विस्थापनाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, येथे रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या पायाभूत सुविधांची वानवा आहे. याबाबत प्रशासनास वारंवार लेखी, तोंडी निवेदन दिले आहे. पण आज अखेर आश्वासना पलिकडे काहीही धरणग्रस्तांच्या पदरात पडले नाही.

या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष गुंडोपंत जिनगरे, उपाध्यक्ष देवू पाटील, कृष्णा जिनगरे, संजय शिंदे, धोंडीबा गुरव, युवराज गुरव आदीसह धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या  सह्या आहेत.