कोल्हापूर/प्रतिनिधी : महायुतीत उमेदवारीवरून सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी जगावाटावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी उमेदवार जाहीर करूनही उमेदवार बदलाच्या हालचाली सुरु आहेत. यामध्ये शिंदे गटाच्या सात ते आठ ठिकाणी उमेदवार बदलाच्या चर्चा आहेत. यामध्ये कोल्हापूरच्या हातकणंगले जागेचा समावेश आहे. भाजपकडून ज्या जागा धोक्यात आहेत त्या जागी नवीन उमेदवार द्यावा त्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची धाकधूक वाढली आहे. पण जिल्ह्यातील भाजप नेते आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी धैर्यशील माने हेच उमेदवार असतील अशी स्पष्टोक्ती दिली आहे. तर आज हातकणंगले मतदार संघाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी धैर्यशील माने हेच उमेदवार असतील असे सांगत हातकणंगले उमेदवार बदलाच्या चर्चांवर पडदा टाकला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर करण्यात आलेल आहेत. महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालं नसलं तरी शिंदेंच्या वाट्याला 12 किंवा 13 जागा येणार असल्याची माहिती आहे. शिंदेंनी चार ते पाच ठिकाणच्या खासदारांना पुन्हा तिकीट देऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामध्ये नाशिक, हातकणंगले, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोलीचा समावेश होता. तर ठाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी असा आग्रह भाजपचा आहे. एकनाथ शिदेंनी हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांना तर हिंगोलीतून हेमंत पाटलांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर यवतमाळ आणि नाशिकचा उमेदवार जाहीर केला नाही. पण उमेदवारी जाहीर करूनही हातकणंगलेमधून उमेदवार बदलाच्या हालचाली सुरु असल्याच्या चर्चा सुरु असल्याने खासदार माने आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण हातकणंगले लोकसभेचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत हा संभ्रम दूर केला.

यावेळी बोलताना पांडुरंग पाटील म्हणाले की, शनिवार पासून मी हातकणंगले लोकसभा मतदार संघात फिरत आहे. यावेळी लोकांशी चर्चा करून माहिती घेत आहे. आतापर्यंत सहा विधानसभा मतदार संघाचा दौरा केला आहे. धैर्यशील माने यांनी कमी काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन विकासाची कामे केली आहेत. त्यमुळे त्यांच्या उमेदवारीबाबत कोणताही संभ्रम नाही. मी स्वतः मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. उमेदवार बदलाच्या तशा कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे हातकणंगलेमधून धैर्यशील माने हेच उमेदवार असतील, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, 7 मे पर्यंत मी मतदारसंघात थांबणार आहे. काय समस्या असतील त्या जाणून घेतल्या जातील . त्यावर मार्ग काढला जाईल. त्याचबरोबर धैर्यशील माने हेच उमेदवार असल्याने कोणताही संभ्रम ठेऊ नका, प्रत्येकाने कामाला लागा. मी आता मतदार संघातच आहे. तसेच उमेदवार बदलाच्या ज्या चर्चा आहेत त्याबाबत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण ते पक्षीय नेतृत्वच मत नाही. तसेच मतदार संघात जी विकासाची कामे जी केली ती कामे घेऊनच आम्ही मतदारांना सामोरे जाणार आणि आम्ही जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हातकणंगल्यात धैर्यशील मानेंना भाजपचा विरोध
जी गत हिंगोलीची तीच गत आता हातकणंगल्याची आहे. हातकणंगल्यातून शिवसेनेने धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा केली आहे. पण त्यांना भाजपचा आधीपासूनच विरोध होता. हातकणंगल्याची जागा ही भाजपने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यातच आता हातकणंगलेमधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील हे धैर्यशील माने यांच्यावर नाराज आहेत. जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत धैर्यशील मानेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे.
धैर्यशील माने यांच्याबद्दल हातकणंगलेमध्ये नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे महायुतीचा एक खासदार कमी होऊ शकतो असं सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मतदारसंघांमधील सर्व कल्पना दिली असल्याचं संजय पाटलांनी सांगितलं. धैर्यशील माने यांचा प्रचार करू नये असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.