कौलव ( प्रतिनिधी ) प्रादेशिक साखर सहसंचालक व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज भरारी पथकाने शाहूनगर परिते ता. करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याची अचानक तपासणी करून वजनकाटा तंतोतंत व चोख असून विश्वासार्हृ असल्याचा निर्वाळा वैधमापन विभागाने दिला आहे.

आज वैधमापन विभागाने अचानक केलेल्या तपासणीअंती काटा चोख असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली. प्रादेशिक साखर सह संचालक व जिल्हाधिकार्‍यांच्या सुचनेनुसार शासनाच्या वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने भोगावती साखर कारखान्याला भेट देऊन अचानक वजन काट्यांची तपासणी केली.

या पथकामध्ये सातारा येथील प्रथम विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था पल्लवी पारकर, करवीरचे नायब तहसिलदार विजय जाधव, वैधमापन विभागाचे निरीक्षक विष्णू कासले, करवीर पोलीस स्टेशनचे हवालदार जालंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजीराव देवाळकर, शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष गुणाजी शेलार यांचा समावेश होता . यावेळी कारखान्याचे केनयार्ड निरीक्षक भिकाजी चौगले हे उपस्थित होते.

कारखान्याच्या चार वेगवेगळ्या वजन काट्यावर या पथकाने वजन तपासणी केली भरलेले व रिकाम्या वाहनांचे वजन करून तपासणी केली असता कारखान्याचे सर्व वजनकाट्यांचे वजन तंतोतंत जुळले. त्यामुळे भोगावतीचा वजनकाटा हा विश्वासार्ह व धर्मकाटा असल्याचे सिद्ध झाल्याचे अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांनी सांगितले.