हमीदवाडा (प्रतिनिधी) : येथील ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी मंदिर परिसरातील सुशोभीकरणाची अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रखडलेल्या कामांबाबत मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता.

सुशोभीकरणाकरिता ‘क’ वर्ग विकास पर्यटन स्थळ या योजनेमधून १५ लाख रुपये मंजूर झाले होते. हे काम बुरहान सय्यद चिखली या ठेकेदाराला मिळाले होते. काम अपूर्ण असताना संबंधित ठेकेदाराला बांधकाम विभागाकडून संपूर्ण बिल आदा केल्याचे समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ, स्थानिक शाखाध्यक्ष विकास पाटील, शाखा उपाध्यक्ष सुशांत मोरे, शाखा सचिव रोहित बुरटे, कार्याध्यक्ष कमलेश रंगापुरे, अंकुश दुरर्डे, गजानन जत्राटे, इंद्रजित वासनकर व इतर महाराष्ट्र सैनिकांनी कागल येथील जि.प.च्या बांधकाम विभागाचे  उपअभियंता यांना अपूर्ण काम पूर्ण दाखवून बिल आदा केल्याबाबत तसेच या कामाची चौकशी होऊन दोषीवर कठोर कारवाई करण्याची आणि अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते.

हे काम ८ दिवसांत पूर्ण झाले नाही तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यावर बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला तत्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि ठेकेदाराने अपूर्ण असणारी कामे ही पूर्ण केली.