पुणे ( प्रतिनिधी ) पुण्यातील फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जिंग लाईव्ह्ज (FUEL) च्या १७ व्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. पाटील यावेळी म्हणाले कि, नवीन शैक्षणिक धोरणात प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे.


या अनुषंगाने पुढच्या वर्षी राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण बंधनकारक असेल‌. त्यासोबतच व्यवसायाभिमुख शिक्षण आणि मातृभाषेतून शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे फ्यूएलनेही अधिकाधिक प्रात्यक्षिक शिक्षण पद्धतीवर भर द्यावा असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. फ्यूएल बिझिनेस स्कूल येथे विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे दर्जेदार शिक्षण मिळत असून या संस्थेचे खासगी विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.


यावेळी फ्यूएलचे संस्थापकीय अध्यक्ष केतन देशपांडे, मुख्य मार्गदर्शक संतोष हुरलीकोप्पी, मनोज पोचाट, शैलेंद्र केवडे, मयुरी देशपांडे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, फ्यूएल शब्दाच्या मराठी अर्थाप्रामाणे ही संस्था तरुण तरुणींना व्यवस्थापन शिक्षणासाठी ऊर्जा देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेतील सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात न घेता प्रयत्नपूर्वक आपल्या पुढील शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवावी.


नव्या अभ्यासक्रमात देशाचा गौरवशाली इतिहास आणि संस्कार मूल्य यावरही भर देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास माहिती होऊन संस्कार मूल्य कशी जपावीत याचे ज्ञानही मिळेल, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी श्री. देशपांडे यांनी फ्यूएल स्कूलच्या कार्याची माहिती दिली. हुरलीकोप्पी यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘होम स्टोरी ऑफ फ्यूएल’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.