पन्हाळा (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघ उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा रहावा यासाठी मल्टीस्टेटच्या विरोधात आम्ही लढा दिला.  आपल्या मताचा स्वाभिमान जागृत ठेवला, याची जाणीव ठेवूनच मतदारांनी मतदान करावे असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ते आज (शनिवार) पन्हाळा येथे नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात राजर्षी शाहू आघाडीच्यावतीने आयोजित गोकुळ ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलत होते.

या वेळी आ. डॉ. विनय कोरे म्हणाले की, मागील अनेक दिवस सातत्याने गोकुळची लढाई सर्व जण मिळून लढत आहोत. आता निर्णायक क्षण जवळ आला आहे. त्यासाठी आम्हाला पन्हाळा आणि शाहूवाडी  तालुक्यांमधून सर्व ठरावधारकांनी साथ द्यावी असे आवाहन केले. या मेळाव्यास खा. संजय मंडलिक, आ. डॉ. विनय कोरे, आ. राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, जि. परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, पन्हाळा नगराध्यक्ष रुपाली धडेल, आघाडीचे सर्व २१ उमेदवार, ११३ ठरावधारक उपस्थित होते.